युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. या कामात बेळगावची एक सुनदेखील महत्वाचा वाटा उचलत आहे ही बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

होय, बेळगावातील शिवबसव नगरातील पद्मजा व प्रल्हाद मन्नूर यांचा मुलगा आदित्य मन्नूर यांची पत्नी दिशा हिने संकटग्रस्त भारतीयांना मायदेशात आणण्यात मोठा वाटा उचलला आहे. मन्नूर कुटुंबीय सध्या मुंबई येथे राहतात. आदित्य आणि दिशा हे व्यवसायाने पायलट असून दिल्ली येथे राहतात. दोघेही एअर इंडियाच्या सेवेत आहेत. दिशाने 2011 मध्ये न्यूझीलंडच्या वेलिंग्टन येथे वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 2017 मध्ये ती एअर इंडियाच्या सेवेत दाखल झाली आहे. जगभरातील विविध देशात विमान चालविण्याचा अनुभव तिच्या गाठीशी आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या 242 भारतीयांना तिने नुकतेच भारतात आणले आहे. नुकतेच तिने 4 वैमानिकांसह एअर इंडियाचे 1947 हे पहिले विमान दिल्लीहून युक्रेनची राजधानी क्वीवपर्यंत चालवून ही कामगिरी केली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये धाडसाने विमानाचे सारथ्य करून अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेत बेळगावच्या सुनेने दिलेले हे योगदान बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे हे निश्चित !


Recent Comments