Belagavi

आम. अभय पाटील यांची स्मार्ट सिटी कमांड सेंटरला भेट

Share

विश्वेश्वरय्या नगर येथे असलेल्या स्मार्ट सिटी कमांड सेंटरला दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी अचानक भेट देऊन योग्यरितीने काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजात दिरंगाई होत असून यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. आज दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी विश्वेश्वरय्या नगर येथे असलेल्या स्मार्ट सिटी कमांड सेंटरला अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने काम करण्याची ताकीद दिली. याचप्रमाणे कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, शहरातील पायाभूत सुविधांव्यतिरिक्त आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि महानगरपालिकेचा लाभ जनतेला मिळावा यासाठी ४५ कोटी रुपयांच्या निधीतून योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून केएसआरटीसी बसेस मार्गांची पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वापरासह पोलीस विभागाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने कमांड कंट्रोल सेंटर कार्यरत आहे.

कमांड सेंटरचे उद्घाटन होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. परंतु अद्याप येथे ९० टक्के कर्मचारी काम करत नसल्याचे सांगत सरकारकडून अजूनही ४५ कोटींच्या निधीतून हा प्रकल्प पूर्ण करायचा असल्याचे ते म्हणाले. यामुळे या सेंटरमध्ये कोणते काम केले जाते याचा तपशील आमदारांनी अधिकाऱ्यांकडे मागितला.

माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी या सेंटरचे उद्घाटन केले होते. मलाही या सेंटरला भेट देण्याची इच्छा होती. परंतु मला याबद्दल माहिती नसल्यामुळे याठिकाणी येणे मला शक्य झाले नाही. सरकारने देऊ केलेला ४५ कोटींचा निधी योग्यपद्धतीने प्रत्येक विभागासाठी वापरण्यात आला नाही. कमांड सेंटर अंतर्गत अनेक विभाग येतात. त्यामुळे याठिकाणी योग्य कामकाज आणि देखभाल करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

यानंतर शहरातील जीपीएस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात देखील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. शहरात अनेक ठिकाणी असलेले जीपीएस सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत आहेत. यामागची कारणे विचारत अधिकाऱ्यांना आमदारांनी चांगलेच धारेवर धरले. जनतेच्या सोयीसाठी सरकार निधी उपलब्ध करून देते, नेमलेल्या अधिकाऱ्यांना पगार देते तर मग काम करायला टाळाटाळ का केली जाते? असे प्रश्न विचारात अकार्यक्षम अधिकाऱ्यांसंदर्भात आमदारांनी अहवाल देखील मागवला.

जनतेला सोय पुरविण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या योजना राबविण्यात अधिकारी दिरंगाई करत आहेत. जनतेच्या सोयोसाठी उभारण्यात आलेल्या कमांड सेंटरमधील अधिकाऱ्यांना आमदारांनी ताकीद देत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याठिकाणी जबाबदार अधिकारी नेमण्यासंदर्भात सांगितले आहे. बेळगाव स्मार्ट सिटी योग्यपद्धतीने नावारूपाला येण्यासाठी आणि जनतेला योग्य प्रशासन देण्यासाठी आमदार प्रयत्न करतील, अशी आशा आहे.

Tags: