Belagavi

छत्रपती शिवाजी उद्यानातील बांबूंनी घेतली पेट शहरात आगीच्या प्रकरणात वाढ वाढत्या तामपणामुळे अनेक ठिकाणी उडतोय भडका

Share

बेळगाव शहरात दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसात अनेक ठिकाणी विविध कारणामुळे आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात असलेल्या बांबूच्या झाडांना आग लागल्याचे दिसून आले आहे.

उन्हाळ्याची सुरुवात झाली असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होत चालली आहे. बेळगावमध्ये अनेक ठिकाणी गेल्या आठवडाभरात आगीच्या घटना घडल्या असून आज शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात देखील बांबूच्या झाडाला आग लागल्याचे निदर्शनास आले. कचऱ्याला लावलेली आग हि बांबूच्या झाडांच्या बुंध्यापर्यंत पसरून सदर प्रकार घडला आहे.

काल वैभव नगर परिसरात रिलायन्स मार्ट जवळ डस्टर कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तापत्या उन्हात उभारलेली कार पाहतापाहता पेट घेऊन जळून खाक झाली. याप्रमाणेच शहरात गादी कारखान्यालाही आग लागल्याची घटना घडली होती. यानंतर आज छत्रपती शिवाजी उद्यानातदेखील असाच प्रकार घडून आला आहे.

एसपीएम रोड ते शहापूर मार्गावरून वर्दळ करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हि बाब आली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दीही केली. तात्काळ उद्यानातील कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी घडली नाही.

Tags: