बेळगावातील शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारील सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे शाळा बांधण्यास परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन स्थानिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
होय, शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारी 8 गुंठे सार्वजनिक जागा आहे. या जागेत शाळा बांधण्याचा प्रयत्न कट्टीमनी शिक्षण संस्थेकडून सुरु आहे. त्याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. विनायक कॉलनीची आखणी करताना 2 एकर जागा गार्डन, सकाळी फिरण्यासाठी अशा सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवण्यात आली होती. तेथे हनुमान मंदिर आणि समुदाय भवन बांधून स्थानिक रहिवाशी दररोज मंदिरात पूजाअर्चा करतात. मंदिराशेजारी 8 गुंठे जागा खुली आहे. तेथे कट्टीमनी खासगी शिक्षण संस्थेकडून बेकायदेशीररीत्या शाळा बांधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला विरोध करून स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या संदर्भात ऍड. कुमार खडकभावी यांनी, सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्याचा नागरिकांचा विरोध आहे असे सांगून प्रसारमाध्यमाना अधिक माहिती दिली.
आणखी एका नागरिकाने सांगितले की, ही जागा सार्वजनिक मालकीची असताना बेकायदेशीररीत्या तेथे खासगी शिक्षण संस्थेकडून शाळा बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली असता, मनपा व बुडाने परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. मात्र आम्ही चौकशी केल्यावर मनपाने तशी परवानगी दिली नसल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही जागा हडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आमचा विरोध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करून बांधकाम बंद करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली.
यावेळी नगरसेवक प्रवीण पाटील, श्रेयस नाकाडी, भास्कर शेट्टी, सतीश चित्रगार यांच्यासह विनायक कॉलनी, शाहुनगरचे रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments