बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी आणण्यात येणारी गोवा बनावटीची दारू आणि वाहन जप्त करून अबकारी अधिकाऱ्यांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. खानापुरात ही कारवाई करण्यात आली.
खानापूर तालुक्यातील रुमेवाडी क्रॉसवर अबकारी खात्याच्या पोलिसांनी वाहन तपासणी चालवली असताना दारूची चोरटी वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला. गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास रुमेवाडी क्रॉसवर अबकारी पोलिसांनी वाहन तपासणी केली असता, एका ह्युंदाई कारमधून गोवा बनावटीची विविध ब्रॅंड्सची ७५० एमएल क्षमतेच्या दारूच्या बाटल्यांचे १० बॉक्स आढळून आले. एकूण ९० लिटर दारू या कारवाईत जप्त करण्यात आली. दारूची किंमत ६३ हजार रुपये आहे.
दारू वाहतुकीसाठी वापरलेल्या ह्युंदाई कारची किंमत ११ लाख रुपये आहे. दारू आणि कार दोन्ही जप्त करण्यात आली. या प्रकरणी हैदराबादजवळील रंगारेड्डी जिल्ह्यातील बडंग पेटे येथील ३८ वर्षीय केशव रेड्डी याला अटक करण्यात आली. बेळगाव विभागाचे अबकारी अपर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, अबकारी उपायुक्त जयरामेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी कर्मचारी दावलसाब शिंदोगी, एस. जी. शिंदे, के. बी. कुरहट्टी, मंजुनाथ बळगप्पनवर, अरुण बंडगी, एस. बी. शिवणगी यांनी या कारवाईत भाग घेतला.
Recent Comments