हुक्केरी शहरात महाशिवरात्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी करण्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. यादिवशी उपवास करून रात्री जागरण करून शिवशंकराचे ध्यान, तपस्या करून शिवकृपेस पात्र होण्याचा प्रयत्न शिवभक्त करतात. हुक्केरी तालुक्यातही विविध ठिकाणी आज महाशिवरात्री साजरी करण्यात आली. तालुक्यातील संकेश्वर येथील शंकरलिंग मंदिरात आज, मंगळवारी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हत्तरगी येथील कारीमठात महादेवाची विशेष पूजा करण्यात आली.
हुक्केरीतील कोर्ट सर्कलमधील महादेव मंदिरात आणि बसस्थानकाजवळील ईश्वरलिंग मंदिरात शिवपिंडीला फुलांची आरास करून सजविण्यात आले होते. सर्व मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. अनेक मंदिरात भक्तांना उपवासाचे पदार्थ प्रसाद स्वरूपात वाटण्यात आले. सुलतानपूर येथील संगमावर कुडलसंगमच्या धर्तीवरील शिवपिंडीचे आसपासच्या गावातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, हुक्केरी येथे शिवरात्रीनिमित्त आज सायंकाळी हास्यसंगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


Recent Comments