देशभर आज महाशिवरात्री अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने साजरी करण्यात येत आहे. विजापुरातही अगदी रणरणत्या उन्हातही भाविकांनी शिवमंदिरे गाठून आराध्य दैवत शिवशंकराचे दर्शन घेऊन महाशिवरात्री साजरी केली.

होय, विजापूर शहराबाहेर असलेल्या शिवगिरी येथे भाविकांचा जणू महासागरच आज सकाळपासूनच शिव दर्शनासाठी लोटला होता. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच महाशिवरात्र आल्याने भक्तांचा उत्साह ओसंडून वाहात होता. शिवगिरी येथे स्थापन केलेल्या 85 फुटी भव्य शिवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी केवळ विजापूर शहर आणि जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातूनही शेकडोंच्या संख्येने भक्तांनी गर्दी केली. विजापूर शहर तसेच ग्रामीण भागातही आज महाशिवरात्री श्रद्धा, भक्तीने साजरी करण्यात आली. सर्व शिव मंदिरातून विशेष पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक, जागरण, ध्यान आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बेलपत्र, फुले-फळे अर्पण करून भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.
शिवगिरीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या टी. के. पाटील चॅरिटेबल ट्रस्टने यंदाही महाशिवरात्री उत्सव श्रद्धा-भक्तीने साजरा करण्यासह सांस्कृतिक दृष्ट्याही जलौषात साजरा करण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विजापूर शहरातील अडवी शंकरलिंग, 770 शिवलिंग मंदिर, सुंदरेश्वर देवस्थानसह अनेक शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तेथे लांबचलांब रांगा लावून भाविक शिवशंकराचे दर्शन घेत आहेत.


Recent Comments