Belagavi

बेळगावात ५ राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना नितीन गडकरी यांच्याहस्ते चालना

Share

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 3972 कोटी रुपये खर्चाच्या 238 किमी लांबीच्या  5 राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी बेळगावात आज कोनशिला बसवली.

होय, बेळगावात सोमवारी जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 3972 कोटी रुपये खर्चाच्या 238 किमी लांबीच्या  5 राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी एकाचवेळी कोनशिला बसवली. भव्य व्यासपीठावर विविध मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. व्यासपीठावर उभारलेल्या भव्य एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून या 5 राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गडकरी यांनी एकाचवेळी चालना दिली.

प्रारंभी बोलताना बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, एकाचवेळी नितीन गडकरी यांनी 3972 कोटी रुपये खर्चाच्या 238 किमी लांबीच्या  5 राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना चालना दिली हा स्वातंत्र्योत्तर भारतातील एक विक्रम आहे. कर्नाटकात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस विशेष, खूप महत्वाचा आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, देशात रस्त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे आम्ही कधी पाहिले नव्हते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी, अमेरिका इतकी श्रीमंत होण्यामागे तेथील रस्त्यांचा विकास कारणीभूत असल्याचे म्हटले होते. त्याचे छायाचित्र नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यालयात लावले आहे. त्यानुसार गडकरी यांनी रस्त्यांच्या विकासावर भर दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग योजनेच्या आधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबवली. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी आधीच्या योजनांपेक्षा अधिक, विक्रमी निधी या योजनेला पुरवला आहे. देशात केवळ 2.7% महामार्गाचे जाळे असताना त्यातही ४०% भागात वाहनांची गर्दी अधिक व्हायची. हे पाहून देशात महामार्गांचे जाळे विस्तारायचा निर्णय सरकारने घेतला. 2014पर्यंत मोदी पंतप्रधान आणि गडकरी मार्ग परिवहन मंत्री होईपर्यंत देशात केवळ 91 हजार किमी लांबीचे महामार्ग होते. म्हणजेच 70 वर्षांत देशात केवळ 91 हजार किमी लांबीचे रस्ते होते. 7 वर्षांत 1 लाख 40 हजार किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा विक्रम पंतप्रधान मोदी आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात देशात दररोज केवळ 12 किमी लांबीचा रस्ता बनवला जात असे. आज गडकरी मार्ग परिवहन मंत्री झाल्यापासून दररोज 37 लांबीचे रस्ते बनविण्यात येत आहेत. भारतमाला योजनेंतर्गत 24 हजार किमी लांबीचे रस्ते बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी 19,482 किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आल्याचे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आज बेळवडी मल्लम्मा यांचा जन्मदिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बहीण मानले होते. मराठी आणि कानडी माणसातील सौहार्दाचे हे एक उदाहरण आहे. माजी रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी विविध कामे घेऊन माझ्याकडे येत असत. आज त्या कामांना चालना मिळत असताना ते आपल्यामध्ये नाहीत असे त्यांनी सांगितले. बेळगाव, संकेश्वर सीमेपर्यंत महामार्गाचे सहा पदरीकरण, चोर्ला, जांबोटी, बेळगावपर्यंतचे दुपदरीकरण, विजापूर, मुरगुंडी, सिद्दापूर या कामांना चालना देण्यात आली आहे. लवकरच भारतमाला योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील कामांची घोषणा करण्यात येणार आहे. आता आमदार, खासदारांच्या मागणीनुसार महामार्गांच्या कामाला चालना दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 12 आरओव्ही महामार्गांच्या कामासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 1600 कोटी रुपये विशेष अनुदान देण्यात आले आहे असे सांगून याबाबत लवकरच प्रस्ताव देण्याची सूचना गडकरी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना केली. मी केंद्रीय जलसंसाधन मंत्री असताना देशात 20 पाणीतंटे होते. त्यापैकी 16 राज्यातील पाणीतंटे मी सोडविले. मात्र मला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पाणीतंटा सोडविता आला नाही. लवकरच हा तंटा सुटला पाहिजे. भारतात अमेरिकेसारखे रस्ते निर्माण करण्यात येतील. तुम्ही लवकर भूसंपादन प्रक्रिया पार पाडा अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना केली.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, बेळगावात आज एक राष्ट्रीय विक्रम झाला आहे. बहुप्रतीक्षित ५ राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना एकाचवेळी चालना मिळाली आहे. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी प्रेरणा आहे. नितीन गडकरी हे मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे सांगून गडकरी यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामांची बोम्मई यांनी प्रशंसा केली. गडकरी यांनी पुणे-मुंबई जलदगती महामार्ग निर्माण करून वाहतूक सुलभ करून दिली. कर्नाटकात एका महामार्गाचा दर्जा सुधारण्यासाठी कितीतरी वर्षे लागत होती. पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महामार्गांच्या कामांना चालना मिळाली आहे. महामार्गाशेजारी अनेक आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे. याक्षणी मी बेळगावात एक घोषणा करू इच्छतो, कर्नाटकाच्या सीमेवरील निपाणीपासून बेळगावातील कित्तूरपर्यंत संपूर्ण जलशक्ती योजना कामाला प्रारंभ करण्यात येईल. गडकरी आपल्या दूरदृष्टीने कर्नाटक व महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांना जोडण्यासाठी रस्ते योजनांना मूर्त स्वरूप अंत आहेत अशा शब्दांत बोम्मई यांनी गडकरी यांची प्रशंसा केली.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये रस्ते विकासाची आणखी कामे हाती घेण्यात येणार आहेत. आमदार आणि खासदारांच्या मागणीनुसार कामांचा त्यात अंतर्भाव केला जाईल. बेळगावच्या खा. मंगल अंगडी यांनी रिंगरोडचा प्रस्ताव मांडला होता. तो आम्ही मंजूर केला आहे. आ. अभय पाटील यांच्या मागणीप्रमाणे काकती फ्लाय ओव्हरही मंजूर केला आहे. परंतु लोक तो होऊ द्यायला तयार नाहीत. त्यामुळे तुम्ही त्याची जबाबदारी घ्या, त्याला आम्ही पुन्हा मंजुरी देऊ. यंदाच्या बजेटमध्ये 1600 कोटी रुपयांचे अधिक अनुदान मिळाले आहे. त्यातून कर्नाटकात 12 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा सदुपयोग करून घ्या असे आवाहन गडकरी यांनी केले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, वनमंत्री उमेश कत्ती, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, बेळगावच्या खा. मंगल अंगडी, चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले, विजापूरचे खा. रमेश जिगजीनगी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, विधानसभा उप सभापती आनंद मामनी यांच्यासह अनेक आमदार, एमएलसी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: