Belagavi

वीरभद्रेश्वर यात्रोत्सवाला भव्य प्रारंभ बेळगाव पोलीस मुख्यालयातील वीरभद्रेश्वर देवस्थानाची आकर्षक सजावट

Share

बेळगाव पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या श्री वीरभद्रेश्वर देवस्थान यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आजपासून तीन दिवस याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या श्री वीरभद्रेश्वर देवस्थान यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून २८ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी नागनूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्याहस्ते यात्रोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हिरेमठ स्वामी, संगमेष स्वामी, आरपीआय तावरेप्पा लमाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज सकाळी श्री वीरभद्रेश्वर देवस्थानात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी डॉ. अल्लमप्रभू महास्वमींनी उद्देशून बोलताना सांगितले कि, भारत हा जगातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा देश आहे. येथील अध्यात्मिकता, धार्मिकता, संस्कार आणि संस्कृती इतर कोणत्याही देशात पाहायला मिळत नाही. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या मंदिरात अत्यंत कार्यक्षम लोकांसोबत काम करणारे पोलीस अधिकारी पाहून अजूनही संस्कार आणि संस्कृती उरली आहे याची जाणीव होते, असे मत स्वामीजींनी व्यक्त केले.

दिनांक १ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त वीरभद्रेश्वर देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सजली ६ वाजता रुद्राभिषेक, त्यानंतर पालखी सोहळा, कपिलेश्वर मंदिर येथे पालखीचे प्रस्थान होऊन दुपारी पुन्हा वीरभद्रेश्वर देवस्थानात पालखी पोहोचणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वीरभद्रेश्वर देवस्थानापासून रथोत्सवाला सुरुवात होऊन त्यानंतर संगोळी रायन्ना चौक, जुना पी बी रोड मार्गे पोलीस मुख्यालयात दाखल होईल. यानंतर रात्री १०.३० वाजता श्री वीरभद्रेश्वर नाट्यसंघाच्यावतीने सुजित एन नायक यांचे सामाजिक-कौटुंबिक नाटक आयोजित करण्यात आले आहे. यानंतर २ मार्च रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

Tags: