युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना, विध्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणणे याला आमचे प्राधान्य आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घातले आहे असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

बेळगावातील सांबरा विमानतळावर सोमवारी पत्रकारांशी बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले, रशिया-युक्रेन युद्धामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तशातही युक्रेनसोबत आम्ही चर्चा सुरु ठेवली आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि उप परराष्ट्र मंत्री मुरलीधर यांच्या आम्ही संपर्कात आहोत. बिकट परिस्थितिमुळे आम्हाला रशियाशीही चर्चा केली पाहिजे. आमच्या नागरिकांना तेथून सुरक्षित बाहेर काढणे याला आमचे प्राधान्य आहे. हा एक मोठा प्रश्न बनला आहे. याआधी इराक, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये युद्धजन्य स्थितीत सरकारने तेथे अडकलेल्या भारतीयांना यशस्वीपणे मायदेशी सुखरूप परत आणले आहे. मात्र यावेळी रशिया-युक्रेन युद्ध अपेक्षेहून अधिक लवकर सुरु झाले आहे. त्याशिवाय भौगोलिकदृष्ट्या युक्रेन खूप मोठा आहे. त्यामुळे आम्हाला अडचण येत आहे. तरीही आमचे प्रयत्न सुरु आहेत. आजदेखील युक्रेनला विमाने जाणार आहेत असे जोशी म्हणाले.
मंत्री जोशी पुढे म्हणाले, युक्रेनला पोहोचणे अवघड झाले आहे. माझ्या मतदार संघातील लोकही मला फोन करून डोळ्यात अश्रू आणून आपल्या मुलांच्या सुटकेची विनंती करत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचा स्वतः पंतपधान मोदी यांनी लक्ष घातले आहे. तेथे वीजपुरवठा, इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे समस्येत आणखी भर पडली आहे. जयशंकर, हरदीपसिंग पुरी याना परराष्ट्र मंत्रालयात काम केल्याचा अनुभव आहे. परराष्ट्र आणि नागरी विमानोड्डाण मंत्रालय याप्रश्नी एकत्र काम करत आहेत. भर सरकार संवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळत आहे. काहीही करून आमच्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे काम सुरु आहे असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
भारतीय विध्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्याकडून मारहाण होत असल्याबाबतच्या प्रश्नावर मंत्री जोशी म्हणाले, सध्या याबाबतचे जे व्हिडीओ समोर येत आहेत, त्यांच्या सत्यतेची शहानिशा करण्याची गरज आहे, भारतीय नागरिक, विध्यार्थ्यांना मारहाण झाली नाही असे आम्ही म्हणत नाही. पण त्यांना सुरक्षित आणण्यात आम्ही व्यग्र आहोत. युक्रेनच्या शेजारी देशांशी संपर्क साधून त्यांचे यासाठी सहकार्य घेण्यात येत आहे. त्यांना मायदेशी आणण्याचा खर्च भर सरकार करत आहे असे जोशी म्हणाले,
एकंदर, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.


Recent Comments