रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील स्नेहा पाटील हि तरुणी आपल्या स्वगृही सुरक्षितपणे परतली असून तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाला काळजी लागली आहे. भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यामधील स्नेहा पाटील हि युवती सुरक्षितपणे आपल्या घरी परतली आहे. विजापूरमधील ऐश्वर्या नगर येथील कंत्राटदार रमेश पाटील यांची कन्या स्नेहा पाटील हिच्या सुरक्षितपणे घरी परतण्याचा आनंद तिच्या कुटुंबीयांनी साजरा केला असून स्नेहाचे स्वागत औक्षण करून आणि मिठाई भरवून करण्यात आले. शिवाय स्नेहाच्या परत येण्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून इतर विद्यार्थीही अशाचपद्धतीने सुखरूपपणे परतावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.
युक्रेन येथे एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी स्नेहा पाटील २२ फेब्रुवारी रोजी विमान प्रवासासाठी निघाली. युक्रेनमध्ये युद्धाच्या सुरुवातीला काहीच वाटले नाही परंतु दिवसेंदिवस तेथील परिस्थिती भयावह होत गेल्याचा अनुभव स्नेहाने यावेळी सांगितला. २३ फेब्रुवारी रोजी बेंगळूर येथे पोहोचून त्यानंतर आपल्या स्वगृही ती सुखरूपपणे परतली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या इतर विद्यार्थ्यांना तिने धीर दिला असून तेथील परिस्थितीचा सामना धैर्याने करण्याची सूचनाही केली आहे.
युक्रेनमधील अनेक विद्यार्थ्यांपैकी विजापूरमधील स्नेहा पाटील हि विद्यार्थिनी आपल्या स्वगृही सुखरूप पोहोचली असून तिच्या परतण्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्नेहा पाटील प्रमाणेच इतर विद्यार्थीही भारतात सुखरूपपणे परतावेत अशी मागणी इतर पालकांकडून होत आहे.


Recent Comments