Belagavi

युक्रेन मधून तातडीने आपली सुटका करा .बेळगाव मधील तरुणीची पालकांकडे विनवणी

Share

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी भयावह स्थितीचा सामना करत असून बेळगावमधील विद्यार्थिनी श्रेया हेरकल हिने युक्रेनमधून तातडीने एअर लिफ्ट करून आपली सुटका करावी, अशी मागणी आपल्या पालकांकडे केली आहे.

युक्रेनमध्ये सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. क्षेपणास्त्र, बॉम्बच्या माध्यमातून रशियाने युक्रेनवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मात्र भयावह स्थितीचा सामना करीत आहेत. युक्रेनमध्ये बेळगावमधील जवळपास ८ विद्यार्थी अडकल्याची माहिती असून यामधील श्रेया हेरकल या विद्यार्थिनीने व्हॉट्सऍपच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करून तेथील भयावह परिस्थितीची माहिती दिली आहे. शिवाय युक्रेनमधून लवकरात लवकर आपली सुटका करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
सध्या भारतातील काही विद्यार्थी बंकरच्या आसऱ्याखाली रहात आहेत. एकीकडे मायनस डिग्री वातावरण आणि दुसरीकडे होणारे स्फोट या भयावह स्थितीत आपण घाबरत असल्याचे श्रेया हिने आपल्या आईला सांगितले. श्रेयांसह तिच्या सोबत असणाऱ्या वारुणी उपाध्ये हिनेही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

श्रेयाच्या आईने प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती देताना सांगितले कि, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची आणि पाण्याची मोठी समस्या होत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी घाबरू नये यासाठी आत्मविश्वासाने ते त्याठिकाणी रहात असून कर्नाटकातील श्रेया या विद्यार्थिनींसह स्नेहा, मोक्षित, संपत, लक्ष्मी नारायण, प्रियांका वारुणी याही विद्यार्थिनी आहेत. युक्रेनमधील अशी परिस्थिती पाहून आपल्याला भीती वाटत असून आपल्या मुलांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे आग्रह करत असल्याची प्रतिक्रिया श्रेयाची आईने दिली आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेल्या युद्धानंतर भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांना भीती वाटत आहे. या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे भारतात परत आणले जावे असा आग्रह करत आपल्या मुलांच्या परतीच्या वाटेकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: