बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली केडीपी बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

बेळगाव सुवर्णसौध येथे सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्णसौध येथील सेंट्रल हॉल येथे तिसऱ्या त्रैमासिक सभेची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली.
या बैठकीत रामदुर्ग येथे तीन बालकांच्या झालेल्या मृत्यूसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बेळगाव डीएचओ डॉ. शशिकांत मुन्याळ यांना या घटनेसंदर्भात जाब विचारला. आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांविरोधात कारवाई का केली नाही असे प्रश्न देखील उपस्थित केले. यावर शशिकांत मुन्याळ यांनी तीन दिवसांचा वेळ मागून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी डीएचओ विरोधात आमदार महादेवाप्पा यादवाड, उपसभापती आनंद मामनी यांनी असमाधान व्यक्त केले. आमदारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात येत नसल्याची तक्रार करत आरोग्य विभागाचे आयुक्त रणदीप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्ह्यासाठी एका योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचनाही देण्यात आली.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनासंदर्भात सभेत काही आमदारांनी संताप व्यक्त केला. प्रादेशिक आयुक्त आदित्य अम्लान बिस्वास यांच्याविरोधातही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
उपसभापती आनंद मामनी, दुर्योधन ऐहोळे, खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, महांतेश दोड्डगौडर, महांतेश कौजलगी, महादेवाप्पा यादवाड, चन्नराज हट्टीहोळी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments