Belagavi

सुवर्णसौधपासून विमानतळापर्यंत आणखी एका रस्त्याची गरज : आम. अभय पाटील

Share

सुवर्णसौधपासून तारिहाळ, चंदन होसूर मार्गावरून सांबरा विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एका रस्त्याच्या निर्मितीसंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बातचीत करण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी दिली.

:बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिंग रोड निर्मितीसाठी आतापर्यंत १२० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. दिवंगत सुरेश अंगडी आणि खासदार मंगला अंगडी यांनी हे कामकाज एका टप्प्यावर आणले आहे. आता या कामाच्या पूर्णत्वासाठी नितीन गडकरी यांच्या निदर्शनास सदर बाब आणून देण्यात येणार असल्याची माहिती अभय पाटील यांनी दिली. राज्यसरकारने निधी मंजूर केला असून अद्याप केंद्र सरकारने निधी मंजूर केला नसल्याचेही गडकरी यांच्या निदर्शनास आपण आणून देणार असून आगामी अर्थसंकल्पात या साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील, आणि ६५ किलोमीटर रस्ते कामकाज दोन टप्प्यात पूर्ण होईल, अशी माहिती अभय पाटील यांनी दिली.

यासह बेळगाव महानगरपालिका महापौर – उपमहापौर निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया देताना अभय पाटील म्हणाले, यासंदर्भात आमदार अनिल बेनके आणि आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. गेल्या महिन्यात या निवडणुका पार पडणार होत्या मात्र अधिवेशनामुळे सदर निवडणुका पुढे ढकलल्या असून मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवण्यात या निवडणुका होतील, असे ते म्हणाले.

महापौर पदासाठी अनेक लॉबी कार्यरत असल्याची माहिती समोर येत असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार अभय पाटील म्हणाले, यासंदर्भात माझ्यापर्यंत कोणतीही माहिती आली नाही. कोणत्याही उमेदवाराची आपण भेट घेतली नाही आणि कोणत्या स्वामीजींना फोनदेखील केला नाही. हा अभय पाटील यांचा निर्णय नसून पक्षप्रमुखांच्या अंतिम निर्णयावर सर्व अवलंबून असल्याचे आमदार अभय पाटील म्हणाले.

निवडणुकीसाठी केवळ एक वर्षाचा अवधी शिल्लक असून मंत्री मंडळ विस्ताराला आपला विरोध असल्याचे अभय पाटील म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली असल्याची माहितीहि त्यांनी दिली. माझी मंत्रिपदाची इच्छा नसून कोणताही अधिकार मिळविण्यासाठी १ ते २ वर्षे आपले समर्थ दाखविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सध्या जे मंत्री कार्यरत आहेत त्यांनाच काम करण्यासाठी अधिक ऊर्जा देण्याची गरज असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.

बेळगाव दौऱ्यावर येणारे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बेळगावमधील विविध विकासकामांसंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Tags: