Belagavi

बसेसवर मराठी फलक लावण्याच्या मागणीचे केएसआरटीसीला निवेदन

Share

परिवहन महामंडळाच्या बसेसवर मराठी भाषेतील फलक लावण्याच्या मागणीचे निवेदन केएसआरटीसीच्या विभागीय नियंत्रकांना आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात आले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज केएसआरटीसीच्या विभागीय नियंत्रकांची भेट घेऊन बसवर मराठी भाषेतील फलक लावण्याच्या मागणीचे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत अनेकदा झालेल्या बैठकांत मराठीबहुल भागातील बसेसवर मराठी भाषेतील फलक लावावेत, वेळापत्रक आणि सूचना मराठी भाषेत द्याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र परिवहन मंडळ त्याची अमलबजावणी करत नाही. त्याशिवाय अनेक गावांची नावेही चुकीच्या पद्धतीने लिहिलेली असतात. ती व्यवस्थित लिहिण्याचे आदेश द्यावेत. बसवरील नामफलक केवळ कन्नड व इंग्रजीत असल्याने मराठी भाषिकांना ते वाचण्यास अवघड जाते.

त्यामुळे तातडीने सर्व बसवर मराठी भाषेतील गावांचे नामफलक लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी समिती नेत्यांनी केली. तसेच याबाबतचे निवेदन दिले. केएसआरटीसीच्या विभागीय नियंत्रकांनी निवेदनाचा स्वीकार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.  यावेळी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सचिव मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, महेश जुवेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Tags: