महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुक्केरी तालुक्यातील दड्डी–मोहनगा येथील श्री भावकेश्वरी देवीची यात्रा उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे. दररोज हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

होय, भारत पौर्णिमेनंतर भरणाऱ्या भावकेश्वरी देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हुक्केरी तालुक्यातील दड्डी-मोहनगा भावकेश्वरी देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकासह गोव्यातील भाविकांनीही हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली आहे.
गेल्या २ वर्षांत कोरोना महामारीमुळे भावकेश्वरी देवीच्या यात्रेवर निर्बंध आले होते. भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नव्हता. पण यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने यात्रा भरविण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात भक्तिभावाने ही यात्रा साजरी करण्यात येत आहे. 
यात्रेनिमित्त भावकेश्वरी देवीची विशेष अलंकारांनी पूजा बांधण्यात आली आहे. गाऱ्हाणे, महाआरती, ओटी भरणे, पालखी उत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात्रेनिमित्त देवीला कोंबडी, बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. तर काही भक्त शाकाहारी नैवैध्य दाखवूनही यात्रा साजरी करत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकासह गोव्यातील भाविकांसह मूळचे दड्डी-मोहनगा परिसरातील पण नोकरी-व्यवसायानिमित्त अन्यत्र राहणाऱ्या नागरिकांनी यात्रेसाठी आपापले गाव गाठले आहे. भक्तांचा महासागर यानिमित्त दड्डी-मोहनगा येथे दररोज जमत आहे. दैनंदिन जीवनातील कष्ट दूर करण्याची प्रार्थना भाविक देवीकडे करताना दिसत आहेत.


Recent Comments