Belagavi

विजया महाविद्यालयात विद्यार्थिनींनी मांडला ठिय्या

Share

बेळगावमध्ये गुरुवारी विजया पॅरा मेडिकल महाविद्यालयात हिजाब प्रकरणावरून सुरु झालेला हायड्रामा दुसरे दिवशीही तसाच सुरु राहिला आहे. या महाविद्यालयात आपल्याला हिजाब परिधान करून प्रवेश देण्यात यावा या आग्रहास्तव विद्यार्थिनींनी ठिय्या मांडून आंदोलन छेडले आहे.

बेळगाव शहरातील सदाशिव नगर येथील विजया पॅरामेडिकल सायन्स कॉलेजमध्ये गुरुवारी झालेल्या हिजाब प्रकरणानंतर आज पुन्हा हा वाद पेटला आहे. महाविद्यालयात आपल्याला हिजाब परिधान करून प्रवेश देण्यात यावा या आग्रहास्तव विद्यार्थिनींनी ठिय्या मांडून आंदोलन छेडले आहे. खबरदारीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना स्वतंत्र वर्गात अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे.

यावेळी महाविद्यालयात १२ विद्यार्थिनी हिजाब, बुरखा परिधान करून आल्या होत्या. यावेळी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींना हिजाब काढून वर्गात प्रवेश घेण्याचे समजले. परंतु विद्यार्थिनींनी आपण हिजाब काढणार नसून आपल्याला स्वतंत्र खोली देण्यात यावी या आग्रहास्तव ठिय्या मांडला. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे अशी सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी विद्यार्थिनींना दिल्या.

हा सारा प्रकार जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, डीसीपी रवींद्र गडादि, यांना कळविण्यात आला आणि त्यानंतर विद्यार्थिनींना स्वतंत्र खोलीत बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आणि विद्यार्थिनींचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.

विद्यार्थिनी आणि शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, विद्यार्थिनींना न्यायालयाच्या आदेशासंदर्भात खात्री पटवून देण्यात आली आहे. पालकांशी चर्चा करण्यात आली आहे. पालकांना आणि विद्यार्थिनींना कार्यालयात बोलावून त्यांना समजावण्यात येणार आहे. सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

गोकाकमध्ये हिजाब वरून सुरु झालेल्या प्रकारासंदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी म्हणाले, गोकाकमध्ये विद्यार्थिनींनी आंदोलन छेडून महाविद्यालयासमोर ठाण मांडले होते. सदर विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या आत घेऊन जाण्यासाठी तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून न्यायालयाच्या आदेशाह्चे पालन करण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे.

Tags: