Belagavi

गांजा टोळीकडून युवकावर धारधार शास्त्राने हल्ला

Share

गॅरेज चे काम आटोपून घरी परतणाऱ्या एका मुलावर गांजा टोळीकडून हल्ला करण्यात आल्याची घटना बेळगावमध्ये घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तपास घेऊन हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी सदर युवकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

बेळगावमधील न्यू गांधी नगर येथे गांजा टोळीकडून महम्मद कैफ तन्वीर बागवान (वय २०) या युवकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. महम्मद कैफ हा गांधी नगर येथील रहिवासी असून मेकॅनिक म्हणून तो काम करत आहे. गुरुवारी आपले काम आटोपून घरी परतत असताना पाच ते सहा जणांच्या गांजा टोळीने या युवकावर अचानक हल्ला चढविला. तलवार, चाकू यासारख्या धारधार शास्त्राने हल्ला करून हल्लेखोर फरारी झाले आहेत.

मुस्ताक देवलापुरे आणि इतर सहा जणांनी महम्मद कैफ याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सदर युवक जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

यासंदर्भात माहिती देताना महम्मद कैफ या युवकाने सांगितले कि, आपल्यावर सहा जणांच्या गटाने तलवारीसहित इतर शास्त्रांनी हल्ला केला आहे. पाच ते सहा जणांच्या गांजा टोळीने आपल्यावर हल्ला चढविल्याचे महम्मद कैफ याने सांगितले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना महम्मद कैफच्या आईने सांगितले, कि आपल्या मुलाचे कुणाशीही वैर नाही. कोणतीही चूक नसताना आपल्या मुलावर हल्ला करण्यात आला असून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

याप्रकरणी डीसीपी रवींद्र गडादि यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे. एफआयआर नोंद करून सदर प्रकरणाचा तपास घेण्यात येईल, आरोपींना तातडीने अटक करण्यात येईल तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वसन डीसीपींनी दिले आहे.

माळमारुती पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून कैफ याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. बेळगावमध्ये अशा गोष्टी वारंवार घडत चालल्या असून पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या साऱ्या प्रकारांवर अंकुश ठेवण्याचे पोलीस विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.

Tags: