Khanapur

खानापुरातील चोऱ्यांप्रकरणी महाराष्ट्रातील ३ सराईत चोरटे ताब्यात

Share

 खानापूर, निपाणी आणि संकेश्वर परिसरातील चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या मूळच्या महाराष्ट्रातील चोरटयांना खानापूर पोलिसांनी हरिहर येथून ताब्यात घेतले आहे.

खानापूर शहरात नोव्हेंबर महिन्यात एकाच रात्रीत सहा घरफोड्या झाल्या होत्या. त्या प्रकरणी या ३ चोरटयांना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. आधी या ३ चोरटयांना हरिहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून सोमवारी या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सोलापुरातील अनिल नगरातील सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय ३०), जुना कऱ्हाड नका, पुणे येथील महेशकुमार तनोज (वय ३१) आणि तानाजी चौक, सोलापूर येथील रहिवासी सारंग उर्फ सागर संजय तोळे (वय २५) अशी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.

हरिहरमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी या तिघांना हरिहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. चौकशीवेळी त्यांनी खानापूर शहरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यामुळे अधिक चौकशीसाठी खानापूर पोलिसांनी त्यांना रविवारी बॉडी वॉरंटवर १ दिवसासाठी ताब्यात घेतले. चौकशी संपल्यावर त्यांना खानापूर न्यायालयासमोर हजर करून पुन्हा सायंकाळी हरिहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खानापूर पोलिसांच्या चौकशीतही या आरोपींची खानापूर शहरात चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे. दावणगेरे येथील चोऱ्यांबरोबरच या तिघांनी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर, निपाणी परिसरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. या टोळीचा प्रमुख सचिन माने यांच्याविरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात काही काळ तुरुंगवासही भोगला आहे.

 

 

 

Tags: