बेळगावमधील अरगन तलावात गेल्या चार दिवसांपूर्वी एका विवाहितेने आपल्या दोन मुलांसहित आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे, शिवाय या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी दिली.

हिंडलगा येथील अरगन तलावात उडी घेऊन एका विवाहितेने आपल्या दोन मुलांसहित आत्महत्या केली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या बोलत होते. सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाचा तपास आणि चौकशी करण्यात येत आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक कार्यरत असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, अशी माहिती बोरलिंगय्या यांनी दिली.
या प्रकरणाच्या तपासाला विलंब का लागत असल्याचे कारण पोलीस आयुक्तांना पत्रकारांनी विचारले. यावर उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले, सदर प्रकरणातील मृतांचे मृतदेह शोधण्यास विलंब झाला तसेच कुटुंबीयांनी तक्रार दाखल करताना गोंधळ केला. यासाठी हे प्रकरण दाखल होण्यासच विलंब झाला. मात्र या प्रकरणाची चौकशी आणि तपास आता सुरु करण्यात आला आहे, असे डॉ. बोरलिंगय्या म्हणाले.
बेळगावमध्ये चोरीच्या प्रकरणात वाढ होत असल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले, शहर आणि परिसरात चोरी आणि चेन स्नॅचिंग सारखे प्रकार वाढत चालले आहे. काही तक्रारीही दाखल झाल्या आहेत. त्यादिशेने पोलीस विभागाने तपास घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रकारामागे इराणी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून मागील प्रकरणांवरून या सर्व गोष्टींचा अभ्यास सुरु असल्याचे डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले.
बेळगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. आत्महत्या, हत्या, वादावादी, धार्मिक, सामाजिक तेढ, चोरी प्रकरणे या सर्व प्रकरणांना हाताळण्यात आधीचे पोलीस आयुक्त अयशस्वी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परंतु अद्यापही हि प्रकरणे शांत होण्याची चिन्हे दिसत नसून नव्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावून बेळगावमध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.


Recent Comments