राज्य आणि राष्ट्रीय सहकार रत्न पुरस्कार विजेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शतायुषी गंगाप्पा माळगी यांचा शंभरावा वाढदिवस हुदली येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

होय, बेळगाव तालुक्यातील खादी ग्राम म्हणून प्रसिद्धी पावलेल्या हुदली गावात शतायुषी स्वातंत्र्यसैनिक गंगाप्पा माळगी यांचा शंभरावा वाढदिवस गावकरी आणि कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विविध संघ-संस्था, ग्रापं सदस्य आणि माळगी यांच्या चाहत्यांनी माळगी यांचा हृध्य सत्कार करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सहकार नेते बाळगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी ते म्हणाले, गंगाप्पा माळगी यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच खादीची वस्त्रे वापरण्यास प्रारंभ केला. १९३७मध्ये महात्मा गांधी यांनी हुदलीला भेट देऊन ७ दिवस वास्तव्य केले होते. त्यावेळी माळगी हे कुटिरातील स्वयंसेवक होते. चरख्यावर खादीचे सूत कताई करून ते महात्मा गांधी यांच्या प्रशंसेस पात्र ठरले. महात्मा गांधींनी त्यांचा रौप्य पदक देऊन सन्मान केला होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यांचे जीवन आजच्या युवा पिढीला मार्गदर्शक आहे.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे माजी आ. एस. सी. माळगी म्हणाले, गंगाप्पा माळगी यांनी १९४२च्या जेल भरो आंदोलनात हिंडलगा तुरुंगात तुरुंगवास भोगला. त्यांनी १९५४मध्ये खादी ग्रामोद्योग सहकारी संघाची स्थापना करून संघाच्या वाढीसाठी ३० वर्षे अविरत कष्ट घेतले. त्यांच्या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. राज्य सरकारने त्यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी अडिवेप्पा माळगी, चन्नबसू माळगी, चंद्रू कुंदरगी, चन्नबसू पवाडी, अज्जाप्प्पा मळगली, शंकर जमनाळी, अधिक नेसरगी, राजू माळगी, मोहन खनगनी, डॉ. शिवनगौडा पाटील, शिवानंद निर्वाणी, बी. ए. बलकुंदी आदी उपस्थित होते.


Recent Comments