Belagavi

बेळगावात आत्महत्या केलेल्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार 

Share

 बेळगावातील हिंडलगा गणपती मंदिरासमोरील अर्गन तलावात मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेतील एका मुलाचा मृतदेह आज, शनिवारी सापडला. तिन्ही मृतदेहांवर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेळगावातील सह्याद्रीनगर येथे राहणाऱ्या क्रिशा मनीष केशवाणी या ३६ वर्षीय महिलेने आपल्या ७ वर्षीय विरेन आणि ४ वर्षीय भाविर या २ मुलांसह हिंडलगा गणपती मंदिरासमोरील अर्गन तलावात शुक्रवारी उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. क्रिशा आणि भाविर या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या जवानांना यश आले होते. मात्र विरेनचा मृतदेह काल सापडू शकला नव्हता. त्यामुळे आज सकाळपासूनच पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. त्यात विरेनचा मृतदेह सापडला.

तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीम्स इस्पितळाला पाठवून देण्यात आले. यावेळी शवागाराबाहेर क्रिशाच्या पालकांनी फोडलेला टाहो काळीज पिळवटून टाकत होता.   क्रिशाच्या माहेरच्या मंडळींच्या उपस्थितीत तिन्ही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, क्रिशाच्या पती व सासरच्या मंडळींनी क्रिशाचा व तिच्या दोन्ही मुलांचा बळी घेतल्याचा आरोप केला आहे. हुंडा व पैशासाठी त्यांनी क्रिशाचा छळ चालविला होता. लग्नाला ९ वर्षे झाल्यानंतरही, क्रिशाचे वडील वारल्याची संधी साधून पती छळ करत होता असा आरोप क्रिशाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

दरम्यान, या प्रकरणी कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी अधिक तपास करत आहेत.

 

 

 

Tags: