Belagavi

बेळगावात जागतिक कॅन्सर जागृती सप्ताहानिमित्त शिबीर  

Share

 ४४ लाख लोकसंख्या असलेला बेळगाव जिल्हा राज्यात लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा आहे. या जिल्ह्यात असांसर्गिक रोगांच्या नियंत्रणासाठी चांगले कार्यक्रम राबविण्यात आल्याचे प्रशंसोद्गार आरोग्य खात्याचे नोडल अधिकारी डॉ. रंगास्वामी यांनी काढले.

बेळगाव जिल्हा इस्पितळात गुरुवारी बालरोग विभागासमोरील सभागृहात जागतिक कॅन्सर जागृती सप्ताहांतर्गत भव्य कॅन्सर तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. रंगास्वामी म्हणाले, राज्यभरात जागतिक कॅन्सर जागृती सप्ताहांतर्गत विविध जागृती कार्यक्रम आयोजिले आहेत. तुमच्या घरी, परिसरात कॅन्सर सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्ती आढळल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, जिल्हा इस्पितळात संपर्क करावा. प्रत्येक नागरिकाने कॅन्सरबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य केले पाहिजे. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण शक्य तेवढे कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

त्यानंतर कॅन्सर जागृती सप्ताहानिमित्त ‘आपली मराठी’सोबत बोलताना डॉ. रंगास्वामी म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील ४४ लाख लोकसंख्येपैकी २८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करून असांसर्गिक रोगांबाबत माहिती घेण्यात आली आहे. हे काम आणखी वेगाने करून पूर्ण केल्यावर दरवर्षी असांसर्गिक रोगांचा वेळीच छडा लावून रुग्णांना तातडीने उपचार देता येतील. सध्या अनेक असांसर्गिक रोगांचा जिल्हा स्तरावर छडा लावण्यात आला आहे. त्याची माहिती संकेतस्थळावर देता आलेली नाही. पण आशा आणि आरोग्य कार्यकर्त्यांनी आरोग्य खात्याच्या नेतृत्वाखाली काटेकोर माहितीचे संकलन केले आहे असे डॉ. रंगास्वामी यांनी सांगितले.

डॉ. रंगास्वामी पुढे म्हणाले, असांसर्गिक रोगांच्या तपासणीसाठी ३० वर्षांवरील प्रत्येकाने दरवर्षी रक्तदाब, मधुमेह आदी चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. दर ५ वर्षातून एकदा स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, मौखिक कॅन्सरच्या चाचण्या प्रत्येकाने केल्या पाहिजेत. समाजाने सहकार्य दिल्यास आरोग्य कार्यकर्ते जागृती कार्यक्रमांचे उत्तम आयोजन करू शकतात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिलाधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, डीएसओ डॉ. बी. एन. तुक्कार, बेंगळूरचे एनसीडी संचालक डॉ. श्रीनिवास, आरसीएचओ डॉ. आय. पी. गडाद, बेळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. प्रभू बिरादार, बीम्स अधीक्षक डॉ. अप्पासाहेब पाटील, जिल्हा सर्जन डॉ. सरस्वती. तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी आदी उपस्थित होते.

 

 

Tags: