हुक्केरीत विकासाचा अमृत महोत्सव आणि नगरोत्थान योजनेंतर्गत विकासकामांसाठी सुमारे १२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्याचा सदुपयोग करून आपले प्रभागाचा विकास साधावा असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती यांनी केले.

हुक्केरी नगरपंचायत सभागृहात नगरसेवकांना उद्देशून बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, हुक्केरीतील प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार, तापं मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, जिपं अभियंते, नगरपंचायत मुख्याधिकारी आणि नगरसेवकांच्या समितीने पाहणी करून, चर्चा करून १५ दिवसांत अहवाल देतील. त्यानुसार विकासकामे सुरु करण्यात येतील. त्यामुळे सर्वानी पक्ष विसरून विकासासाठी झटावे असे आवाहन मंत्री कत्ती यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष अण्णागौडा पाटील यांनी मंत्री कत्ती यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी उपाध्यक्ष आनंद गंध, तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, मुख्याधिकारी मोहन जाधव, अभियंते गौरीशंकर माळांक, नगरसेवक महावीर निलजगी, जयगौंडा पाटील रेखा चिक्कोडी, उदय हुक्केरी, गजबर मुल्ला, राजू मुन्नोळी आदींनी प्रभागातील समस्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या.
यावेळी मंत्र्यांचे विशेषाधिकारी राजशेखर पाटील, उमेश सिदनाळ, अभियंते गिरीश देसाई, कृषी सहायक संचालक महादेव पटगुंदी, हिरशुगर्सचे संचालक अशोक पट्टणशेट्टी, जयगौडा पाटील, गुरु कुलकर्णी आणि नगरसेवक उपस्थित होते.


Recent Comments