मुंबई, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या ६७ हुतात्म्यांना बेळगावात आज शिवसेनेतर्फे व मराठी बांधवांतर्फे आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
८ फेब्रुवारी १९६९ रोजी तत्कालीन उप पंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यादिवशी मुंबई आणि बेळगावसह सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठा सत्याग्रह करण्यात आला. यावेळी मोरारजी देसाई यांचा ताफा अडवून त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे सरसावलेल्या शिवसैनिकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्या ठिकाणी व मुंबईत अन्यत्र झालेल्या संघर्षात शिवसेनेचे एकूण ६७ सैनिक कामी आले. या हुतात्म्यांना महाराष्ट्र व सीमाभागात शिवसेनेतर्फे दरवर्षी ८ फेब्रुवारीला अभिवादन करून आदरांजली वाहण्यात येते. त्याचप्रमाणे आज हुतात्मा दिन पाळून बेळगावातही शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी बांधवांतर्फे हुतात्मा शिवसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. 
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी हुतात्मा दिनाचे महत्व सांगून हुतात्मा शिवसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले.
माजी महापौर सरिता पाटील यांनी ‘आपली मराठी’सोबत बोलताना, मुंबई व सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शिवसैनिकांना आजच्या दिवशी अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात येते. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे युती सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांनी एकसंघपणे सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सीमाभागात मराठी भाषिकांवर अनन्वित अत्याचार करण्यात येत आहेत. निष्पाप मराठी युवकांना, कार्यकर्त्यांना ४६ दिवस नाहक तुरुंगात डांबण्यात आले. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घेऊन लढा दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. 
यानंतर बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, सीमाप्रश्नाच्या लढ्यात अनेकांनी तुरुंगवास भोगला. छळ सहन करत हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती जाती-धर्म असे कोणतेही भेदभाव न बाळगता आपल्या हक्कांसाठी लढा देत आहे. लवकरात लवकर सीमाप्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. बाईट
यावेळी माजी आ. दिगंबर पाटील, माजी महापौर व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव मालोजीराव अष्टेकर, शिवाजी सुंठकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मनोज पावशे, राजकुमार बोकडे, दिलीप बैलुरकर, समिती नेते किरण गावडे आदींसह म. ए. समिती, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments