Belagavi

हिजाब प्रकरणी बेळगावमध्ये काँग्रेसचे आंदोलन

Share

शाळा – महाविद्यालयात हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आग्रह करत काँग्रेस अल्पसंख्यांक बेळगाव जिल्हा घटकच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात छेडण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस अल्पसंख्यांक बेळगाव जिल्हा घटकच्या कार्यकर्त्यांच्यावतीने हिजाब परिधान करणे आवश्यक असल्याचे सांगत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आग्रह केला. याप्रकरणी शासनाने आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस अल्पसंख्यांक घटक उपाध्यक्षा तबस्सुम मुल्ला म्हणाल्या, हिजाब हा आमचा हक्क आहे. हिजाब वाचविण्यासाठी आमची मुंडन करायचीही तयारी आहे. आम्हीही भारतीय आहोत, देशप्रेमी आहोत. आमचा हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. राजकीय उद्देशासाठी जनतेमध्ये द्वेष पसरविण्यात येऊ नये, असे त्या म्हणाल्या.

यावेळी एका विद्यार्थिनीने प्रतिक्रिया देताना सांगितले कि, आम्ही आमचा हक्क मागत आहोत. सरकारचा आमच्या हिजाब वर डोळा का आहे? सरकारकडे विकासासाठी अनेक कामे आहेत. विकासकामे सोडून अशा विषयात सरकार का लक्ष घालत आहे? मुलांना उत्तम शिक्षण पुरविण्याऐवजी अशा विषयांचे राजकारण करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा विचार आहे असे मत विद्यार्थिनीने व्यक्त केले.

यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक बेळगाव जिल्हा घटकइ अध्यक्ष इमरान तपकीर, उपाध्यक्षा तबस्सुम मुल्ला, हाजी मुसा, घोरी खान आदींसह काँग्रेस अल्पसंख्यांक घटकचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: