Belagavi

उद्योजकाच्या अपहरण प्रकरणी ३ प्रमुख आरोपीना अटक : पोलीस आयुक्त बोरलिंगय्या

Share

 क्रिप्टोकरन्सी व्यवहार चालविणारा हुबळीतील व्यावसायिक रविकिरण भट याच्या अपहरणप्रकरणी प्रमुख आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी दिली.

बेळगावात आपल्या कार्यालयात रविवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, रविकिरण भट यांनी, काहींनी आपले अपहरण करून हातपाय बांधून छळ करून खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणी आम्ही ८ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर फरारी असलेल्या ३ प्रमुख आरोपीना अटक केली आहे. आणखी एक फरारी आरोपी युनूस काजी याचा शोध सुरु आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे. महाराष्ट्रातील सांगली येथील शहनवाज चमन शेख, अज्जू चमन शेख आणि अभिषेक शेट्टी या ३ प्रमुख आरोपीना अटक करण्यात आली आहे. मूळचा बेळगावचा असलेला फरारी आरोपी युनूस काजी याचा शोध घेण्यात येत आहे.

बिटकॉइन व्यवहारात फसवणूक झाल्यावरून रविकिरण भट याचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. भट यांच्या अपहरणकर्त्यांनी ३ कोटी रुपये खंडणी मागितली होती. अपहरण झालेल्या रविकिरण भट याच्यावर महाराष्ट्रातील सोलापूर येथील एका खासगी बँकेच्या मॅनेजरची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्या मॅनेजरने याबाबत रविकिरण भट याने रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने २ कोटी रुपये उकळले, बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करतो असे सांगून त्याने आपल्याला फसवले असल्याचे व्हीडिओ संदेशात सांगितले आहे. रविकिरण भट याच्यावर आरोप करणाऱ्या करमाळा येथील बंधन बँकेच्या माजी उद्योगपतीच्या विरोधात बेळगावातील एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एकंदर बिटकॉइन फसवणुकीतून अपहरण झाल्याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी एकूण ११ जणांना अटक केली आहे. आणखी एका फरारी आरोपीचा बेळगाव पोलीस शोध घेत आहेत. आता पुढील तपासातच याबाबतची अधिक माहिती उघड होणार आहे.

 

 

 

 

Tags: