बेळगावातील खासगी भाजीमार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिवसरात्र बेमूदत आंदोलन सुरु केले आहे. एपीएमसीच्या आवारातच झोपून भारतीय कृषक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.

होय, भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली कृषक समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळ, गुरुवारपासून एपीएमसीच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या निदर्शक शेतकऱ्यांना एपीएमसीमधील काही व्यापाऱ्यांनीही पाठिंबा व्यक्त केला आहे. एपीएमसीचे संचालक करीगौडा यांच्या निषेधार्थ कालपासून पुकारलेले आंदोलन बेमुदत सुरु ठेवण्यात आले आहे. काल निदर्शक शेतकऱ्यांनी एपीएमसी संचालक आणि अधिकाऱ्यांना बैठकीवेळी सभागृहात कोंडून घालत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर एपीएमसी आवारातच गुरुवारी रात्री झोपून प्रशासनाच्या मनमानीचा त्यांनी निषेध केला.
गुरुवारी संपूर्ण रात्र एपीएमसी आवारातच झोपून आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारीही आपले आंदोलन सुरूच ठेवले. बेळगावातील गांधी नगराजवळ सुरु केलेल्या खासगी जयकिसान भाजीमार्केटला एपीएमसीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. आधीच कोरोना व अन्य कारणांमुळे आर्थिक संकटात असलेल्या व्यापाऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून एपीएमसी भाजीमार्केटमधील गाळे खरेदी केले आहेत. त्यात आता खासगी भाजीमार्केटमुळे त्यांच्या व्यापारावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे जयकिसान भाजीमार्केट बंद करावे अशी त्यांची मागणी आहे.
या संदर्भात बोलताना एपीएमसीतील व्यापारी सतीश पाटील यांनी सांगितले की, आम्ही स्वतःची घरेदारे, जागा विकून, सोनेनाणे गहाण ठेवून एपीएमसी भाजीमार्केटमधील गाळे खरेदी केले आहेत. कोविडमुळे आधीच आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात खासगी मार्केटमुळे आम्ही आणखी डबघाईला आलो आहोत. मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन खासगी भाजीमार्केट बंद करावे अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर शेतकरी नेते सिदगौडा मोदगी म्हणाले, आम्ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी लढा देत आहोत. खासगी भाजीमार्केटमुळे शेतकऱ्यांचा कसलाच फायदा होणार नाही, उलट त्यांचे शोषणच होईल. आम्ही एवढे आंदोलन करत असूनही जिल्हाधिकारी मात्र काहीच बोलत नाहीयेत असा त्रागा त्यांनी व्यक्त केला. बाईट एकंदर, खासगी भाजीमार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात आंदोलन सुरु केले आहे. त्यांना सरकार न्याय देणार का हे पहावे लागेल.


Recent Comments