Banglore

बेंगळूरमध्ये राज्यपालांच्या हस्ते फडकला तिरंगा

Share

बेंगळूर येथील माणिक शहा परेड मैदानात ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी स्वावलंबी भारतासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विविध पथकांच्यावतीने राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेले पथसंचलन राज्यपालांनी खुल्या वाहनातून पहिले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी आपल्या भाषणात बोलताना राज्यपाल म्हणाले, सध्या देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे sankat आहे. या संकटाचा सामना प्रत्येकाने नियमांचे पालन करून करणे आवश्यक आहे. कोविड नियंत्रणासाठी कार्यरत असणारा पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि सर्व फ्रंट लाईन कार्यकर्त्यांचे राज्यपालांनी आभार मानले. उत्तर कर्नाटकात अतिवृष्टी ओढवलेल्या या परिस्थितीचा प्रभावीपणे सामना केला आहे. कर्नाटक हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक असून राज्यात अनेक योजनांच्या माध्यमातून प्रगतीपर कार्य केले जात असल्याचे राज्यपाल म्हणाले.

राज्य सरकारच्यावतीने अमृत महोत्सव कार्यक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत शासनाने कार्यक्रम अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी पाणलोट विकसित करण्यात येत असून २०२१-२२ या वर्षात १४७२ कोटी रुपयांच्या कामकाजाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्यपालांनी दिली.

या कार्यक्रमाला विधानसभा सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी, विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी, महसूल मंत्री आर अशोक, खासदार पी सी मोहन, आमदार एन ए ह्यरिस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: