Belagavi

पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिन साजरा

Share

बेळगाव शहरातील जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ७३ व्या प्रजासत्ताकदिनी बेळगावचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी तिरंगा फडकविला.

पोलीस विभागाकडून मानवंदना स्वीकारून गोविंद कारजोळ यांनी तिरंगा फडकविला. या कार्यक्रमात एनसीई, केएसआरपी, अबकारी, गृहरक्षक दलातर्फे आकर्षक पथसंचलन करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, बेळगाव जिल्हा ऐतिहासिकदृष्ट्या रचना आणि मांडणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्ती आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लढ्यात सहभाग घेतला आहे. अनेकांनी बलिदान दिले आहे. राणी चन्नम्मा, रायन्ना यांच्यासारख्या योध्यांमुळे बेळगावला इतिहास आहे. हि आपली जन्मभूमी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे गोविंद कारजोळ म्हणाले. भारतीयांना सार्वभौमत्व प्राप्त झालेल्या प्रजासत्ताक दिनी आपल्या राष्ट्राच्या विकासाचा संकल्प साऱ्यांच्या सहकार्याने करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यापुढे बोलताना ते म्हणाले, सामाजिक न्यायाची संकल्पना राबविण्यासाठी झटणारे आपले सरकार गरीब, मागास, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगार, उद्योगपती, व्यापारी आदींच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. सर्वांनी एकरूप होऊन माती, प्रजासत्ताक व्यवस्था तसेच संविधानाच्या मूलभूत आकांक्षांवर एकसंघ राहण्याचे आवाहन जिल्हा पालकमंत्र्यांनी केले.

या कार्यक्रमाला शहर उत्तर चे आमदार अनिल बेनके, प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास, आयजीपी सतीशकुमार, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, एसपी लक्ष्मण निंबर्गी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: