Athani

अबब! एक, दोन नाही तर तर शंभर कोटींचा घोटाळा उघडकीस!

Share

हुबळी वीज पुरवठा महामंडळात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पूर परिस्थिती कामकाजासंदर्भातील बनावट कागदपत्रे तयार करून भ्रष्टाचार करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली असून सदर प्रकरणात सहभागी असलेल्या तब्बल २० अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश बजाविण्यात आला आहे.

अथणी येथे शंभर कोटींच्या घोटाळ्याच्या आरोखाली २० हेस्कॉम विभागातील अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पाऊस, वाऱ्यामुळे कोसळलेल्या विजेच्या खांबांची दुरुस्ती, वीजवाहिन्यांची दुरुस्ती, वीजवाहिन्या बदलणे यासह विविध कामकाजांतर्गत बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उघडकीस आले असून यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात सहायक कार्यकारी अभियंते एस एच बहुरूपी, आर एच कलारी, गीता काड्लास्कर, जे व्ही संपन्नावर, व्ही. जे. नायक आणि लेखापाल बी एम पाटील, सहाय्यक लेखापाल वाय एस केळगडे, सहायक अभियंते मालकाप्पा, व्ही ए गणी, एस बी बुळ्ळगौड, डी के कांबळे, आर सी राठोड, कनिष्ठ अभियंते एस ए पर्थहळ्ळी, एन बी नेमण्णावर, बी एस शिलवंतर, एस बी माहीशवाडगी, जी एस कोलकर, वरिष्ठ सहायक एम के कुलकर्णी, ऑपरेटर सी के हिरेमठ आणि स्केल रीडर के एस ठक्कण्णावर यांच्यासह वीस जणांच्या निलंबनाचा आदेश देण्यात आला आहे.

सरकारी योजनांमधील गंगा कल्याण, कॅपेक्स, वॉटर सप्लाय, ओटीएम, फ्लड ऍण्ड ऍडिशनल टीसी यासह विविध कामकाजाच्या अंमलबजावणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करण्याच्या कारणास्तव निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आमदार महेश कुमठळ्ळी मतदार संघात झालेल्या या भ्रष्टाचाराचा हा आरसा असून हेस्कॉम सह इतर विभागाकडेही आता जनता संशयाच्या नजरेने पाहात आहे.

Tags: