बेळगाव जिल्ह्यातील एस एस एल सी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी गोकाकच्या सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने एस एस एल सी अभ्यासिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बेळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध विषय समाविष्ट असलेल्या अभ्यासिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी चित्रदुर्गचे माजी खासदार बी एस चांद्रप्पा यांच्याहस्ते वृक्षारोपणाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार एम बी पाटील यांच्याहस्ते अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना बी एस चंद्रप्पा म्हणाले, विद्यार्थ्यांमधील भीती, न्यूनगंड दूर करण्यासाठी आमदार सतीश जारकीहोळी यांनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले

यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत आपण केलेल्या कार्यावर आपले शिक्षण अवलंबून असते असे सांगितले. सदर अभ्यासिका प्रत्येक शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हल्लीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा अधिक असून सदर अभ्यासिका विद्यार्थ्यांना सोयीची ठरेल, असा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
यानंतर बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सतीश जारकीहोळींच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. शालेय जीवनात कमी गुणांनी उत्तीर्ण होऊनही राज्यात आणि देशात सतीश जारकीहोळी यांनी नाव कमविले आहे. केवळ राजकारणच नाही तर समाजकारणातदेखील ते अग्रेसर आहेत. नीतिमूल्ये आणि शिक्षण यातील फरक ओळखणारे सतीश जारकीहोळी हे सर्वांसाठी आदर्श असून शिक्षणासाठी राबविण्यात आलेला दहावी अभ्यासिकेचा उपक्रमदेखील कौतुकास्पद असल्याचे हेब्बाळकर म्हणाल्या.
यावेळी आमदार एम बी पाटील यांनी देखील अभ्यासिका उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारची पुस्तके केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना वितरित केली जावीत. जिल्ह्यातील शाळांना वितरित करण्यात आलेल्या पुस्तकांचा आदर्श घेऊन शासनाने अशी पुस्तके राज्यभरातील शाळांमध्ये जरूर वितरित करावीत, असा सल्ला दिला.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे वरिष्ठ नेते, काँग्रेस कार्यकर्ते, सतीश जारकीहोळी समर्थक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments