Belagavi

बेळगावात विकेंड कर्फ्यू रद्द करूनही बाजारपेठे शुकशुकाट 

Share

 सरकारने विकेंड कर्फ्यू रद्द केला असला तरीही बेळगावच्या बाजारपेठांत रविवारी सुटीचा दिवस असूनही शुकशुकाट दिसून आला. ग्राहकांअभावी व्यापारी आणि दुकानदारांना नुकसान सोसावे लागले.

होय, विकेंड कर्फ्यूमुळे अर्थचक्राला फटका बसत असल्याने तसेच कोरोनाची तीव्रता म्हणावी तितकी जाणवत नसल्याने सरकारने विकेंड कर्फ्यू रद्द केला आहे. त्यामुळे सप्ताहअखेरीस सुटीच्या दिवशी व्यापार-उदीम पुन्हा भरेल ही अपेक्षा मात्र फोल ठरली आहे. बेळगावातील खडेबाजार, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, रविवार पेठ, कांबळी खुंट, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, शनिवार खुंट आदी वर्दळीच्या बाजारपेठ भागात रविवारी अपेक्षित संख्येने ग्राहक दिसले नाहीत. त्यामुळे व्यापारीवर्ग चिंतेत दिसला.

ग्राहकांच्या थंड्या प्रतिसादाबद्दल व्यापाऱ्यांनी ‘आपली मराठी’जवळ प्रतिक्रिया व्यक्त केली. आज रविवार असल्याने सकाळी ६ वाजताच भाजी विक्रीसाठी आलो आहे. मात्र व्यापार होत नाहीय. लोक बाजारात फिरकून बघायला तयार नाहीत असे एका भाजी विक्रेत्याने सांगितले.

आणखी एका दुकानदाराने सांगितले की, विकेंड कर्फ्यू रद्द झाल्याची नीट माहिती सरकारने लोकांना दिलीय की नाही अशी शंका येते आहे. विकेंड कर्फ्यू असल्याप्रमाणेच लोक खरेदीसाठी येत नाहीयेत. त्यामुळे आमचा व्यापार ठप्प झाला सून, दुकानभाडे आणि कामगारांचा पगार, वीजबिल आदी खर्च भागविणे कठीण झाले आहे असे सांगितले.

एकंदर, कोरोना रोखण्यासाठी म्हणून जारी केलेल्या विकेंड कर्फ्यूमुळे बाजारपेठेतील अर्थचक्र थांबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी, दुकानदार, भाजीविक्रेते शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारनेच यावर काही उपाययोजना करायला हवी अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.

 

 

Tags: