माजी खासदार प्रकाश हुक्केरी आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यात सुरु असलेल्या श्रेयवादामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या शाळा इमारतीचे उद्घाटन अद्याप झाले नाही. हि इमारत आणि नव्या इमारतीत कामकाज सुरु होण्याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.

चिकोडी येथे राजकीय श्रेयवादामुळे केंद्रीय विद्यालयाची इमारत उद्घाटनापासून वंचित आहे. गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या इमारतींमुळे या शाळेतील विद्यार्थी शेजारील सरकारी शाळेत शिक्षण घेत आहेत. सध्या कोविड रुग्णांची संख्या अधिक होत असल्याने तसेच अनेक शाळेतील विद्यार्थी कोविड बाधित होत असल्याने याची धास्ती विद्यार्थ्यांसहित पालकांनी घेतली आहे. चिकोडी परिसरात तत्कालीन खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या परिश्रमातून केंद्र सरकारकडे मागणी करून चिकोडी केंद्रीय विद्यालयाची अनुदान मागण्यात आले होते. यानंतर या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. गेल्या २ वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून अद्यापही या इमारतीचे उद्घाटन झाले नाही.
इंग्रजी माध्यमात शिकण्यासाठी हजारो रुपये डोनेशन देऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या परिसरात केंद्रीय विद्यालय सुरु करून विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे. परंतु या इमारतीचे उद्घाटन अद्याप न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. )
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या चिकोडीमध्ये सध्या कोविड रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे.वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे या परिसरातील सरकारी शाळेत केंद्रीय विद्यालयाचे वर्ग भरविण्यात येत आहेत. एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांची अधिक गर्दी झाल्यामुळे कोविड संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून केंद्रीय विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments