विकेंड कर्फ्यू रद्द होताच आज बेळगावातील बाजारपेठांत फुल्ल रश झाल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे जनजीवन सुरळीत सुरु झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

होय, जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यातील विकेंड कर्फ्यू रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केला. त्यानंतर आज, शनिवारी नागरिकांनी बेळगावातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे फुलून गेल्या. हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये भाजीमार्केट, प्रमख रस्ते आणि चौकात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसले. विकेंड कर्फ्यू रद्द झाल्याने शहरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरु होती. खास करून शनिवारचा बाजार असल्याने भाजीमार्केट व अन्य बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्याचे दिसले.
गणपत गल्ली, रविवारपेठ, कांदा मार्केट, बुरुड गल्ली, कांबळी खुंट, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, शनिवार खुंट, काकतीवेस रोड आदी बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. मात्र सामाजिक अंतर, मास्कचा वापर अशा कोविड नियमांकडे नागरिकांनी साफ दुर्लक्ष केल्याचेही दिसले. विकेंड कर्फ्यू रद्द झाला असला तरी, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण कोरोनाचा विळखा अजून सैल झालेला नाही. त्यामुळेच ‘कराल नियमांकडे दुर्लक्ष तर व्हाल कोरोनाचे लक्ष्य’ हे विसरून चालणार नाही.


Recent Comments