देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी मंजूर झालेल्या अनुदानाची शेकडा ५ इतकी रक्कम लाच स्वीकारताना बेळगावातील धर्मादाय खात्याच्या तहसीलदाराला आणि त्यांच्या नातेवाईकाला एसीबीने रंगेहात पकडले.
होय, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री सापळा रचून धर्मादाय खात्याच्या तहसीलदाराला आणि त्यांच्या नातेवाईकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. दशरथ नकुल जाधव आणि त्यांचा नातेवाईक संतोष कडोलकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रामदुर्गमधील यकलम्मा देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी धर्मादाय खात्याच्या आराधना योजनेतून ४ लाख रु अनुदान मंजूर झाले आहे. ते देण्यासाठी तहसीलदार दशरथ जाधव यांनी २० हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. याबाबत देवस्थानचे सुभाष घोडके यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सापळा रचून एसीबी अधिकाऱ्यांनी तहसीलदार जाधव यांच्या वतीने लाच स्वीकारणारा त्यांचा नातेवाईक संतोष कडोलकर याला रंगेहात पकडले. त्यानंतर या प्रकरणी तहसीलदार जाधव यांनाही अटक करण्यात आली. एसीबी एसपी बी. एस. न्यामगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय अडिवेश गुदीगोप्प, सुनीलकुमार यांनी ही कारवाई केली.
Recent Comments