Belagavi

कोविड भत्ता देण्याची बीम्स शुश्रुषाधिकाऱ्यांची मागणी

Share

कोविड काळात जीवाची पर्वा न करता आपण सेवा केली आहे. सरकारने मंजूर केलेला कोविड भत्ता त्वरित देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव बीम्सच्या शुश्रुषाधिकाऱ्यांनी केली आहे.

कर्नाटक राज्य सरकारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या शुश्रुषाधिकारी संघाच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष भीमाप्पा मादार बोलताना म्हणाले, कर्नाटक शासनाने कोविड काळात सेवा बजाविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शुश्रुषाधिकाऱ्यांना कोविड भत्ता देण्याचा आदेश दिला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या शुश्रुषाधिकाऱ्यांना आतापर्यंत कोविड भत्ता मिळाला नाही. कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आम्ही सर्वांनी काम केले असून शासनाने त्वरित आम्हाला कोविड भत्ता द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात काळा पोशाख परिधान करून आपले कार्य सुरु ठेवले आहे. बीम्सचे वरिष्ठ आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी आमच्या कार्याचे कौतुक केले आहे. शासन दरबारी आमच्यासाठी पत्र लिहून आमची मागणी मांडण्याचा भरवसा देखील त्यांनी दिला आहे. यामुळे आम्ही काळा पोशाख परिधान करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या हक्काचा कोविड भत्ता आपल्याला मिळावा, आमच्या कार्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी आम्ही मागणी करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संघाचे प्रधान सचिव तन्वीर अहमद, खजिनदार सुधीर नायक, उपाध्यक्ष विद्याश्री भजंत्री, मनीषा कामात, हरीश चिगरे आदी उपस्थित होते.

Tags: