बेळगावच्या वनविभागाच्या इतिहासात प्रथमच समृद्ध परिसराचा आनंद लुटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बेळगाव वनविभागातील निसर्ग पाहण्यासाठी आणि वनविभागातील विविध वैशिष्ट्य न्याहाळण्यासाठी वनविभागाच्यावतीने जनतेला आवाहन करण्यात आले आहे. ८ हुन अधिक ट्रेकिंग पॉईंट्स नक्की करून याठिकाणी गाईड नेमण्यात आले आहेत. धामणे वनविभागात ३, कणकुंबी येथे ३ तर नागरदाळी येथे २ ट्रेकिंग पॉईंट्स आणि मार्ग नक्की करण्यात आले आहेत, अशी माहिती डीसीएफ हर्षबानू यांनी दिली आहे.
येथील स्थानिक जनतेपैकी ४५ जणांची निवड करण्यात आली असून त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तसेच इतर संस्थांकडून इकोटुरिझम विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. झाडे, वृक्ष, वनस्पती, पक्षी आणि प्राणी पर्यावरणाची ओळख करून देत तसेच मानवी पर्यावरणाचे महत्त्व सांगून ट्रेकिंग टूर चे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करणे, ट्रेकर्सना मार्गदर्शन करणे आणि जंगलाचे संवर्धन करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
घनदाट जंगलात वास्तव्यास राहणारे अनेक नागरिक आहेत. याचठिकाणी जंगलसफारी करणाऱ्या ट्रेकर्सची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ट्रेकर्सकडून मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेच्या माध्यमातून येथील स्थानिक नागरिकांचे जीवनमान सुधारेल या हेतूने हे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना ट्रेकिंगसाठी बुकिंग करायचे आहे, त्यांनी www.karnatakaecotourism.कॉम या संकेतस्थळावर जाऊन १५० रुपये शुल्क अदा करून तिकीट बुकिंग करायचे आहे.
ट्रेकिंग दरम्यान अनेक अनुचित घटना घडत असतात. यामुळे ट्रेकर्सनी अधिकृतरीत्या तिकीट बुकिंग करून वनविभागाच्या ट्रेकिंगचा आनंद घ्यावा, यासाठी तिलारी, धामणे, काडा, हंडीभडंगनाथ, नागरगाळी, कणकुंबी यासह आठ ठिकाणी तिकीट बुकिंग सुरु असल्याची माहिती हर्षबानू यांनी दिली आहे.


Recent Comments