अभिनेता सलमान खानचे बांद्रे येथील “हिट अँड रन प्रकरण’, दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या बलात्कार प्रकरणासह बॉलिवूडच्या विविध कलाकारांचे वकील असलेले ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत शिवदे (६४) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वर्षभरापासून ते कर्करोगाने आजारी होते.

सत्र न्यायालयासह उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी अनेक खटल्यात कामाचा ठसा उमटविला होता. मालेगाव बॉम्बस्फोटातील लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते.
ऍड. शिवदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला प्रारंभ केला. खासदार वंदना चव्हाण, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. विराज काकडे, ऍड. विजय सावंत आदी सहकाऱ्यांसमवेत त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ऍड. शिवदे फौजदारी खटल्यात निष्णात वकील म्हणून नावाजले होते. अभिनेता सलमान खान याच्याकडून मुंबईतील वांद्रे येथे अपघात (हिट अँड रन) झाला होता. या खटल्यात ऍड. शिवदे यांनी खान याची बाजू मांडली होती. हिरे व्यापारी, चित्रपट निर्माते भरत शहा यांच्या विरोधात गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. शहा यांच्यातर्फे ऍड. शिवदे यांनी काम पाहिले होते. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपातील खटल्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली होती.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात लष्करी अधिकारी प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर ऍड. शिवदे यांनी बाजू मांडली होती. शिवदे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात शोककळा पसरली. पुणे बार असोसिएशनकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


Recent Comments