बेळगावातील मराठी माणसाला शत्रू मानून कर्नाटक सरकार त्यांच्यावर खोटे गंभीर गुन्हे दाखल करून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने २२ जानेवारीला कोल्हापूर–बेळगाव निषेध पदयात्रा काढण्याचे ठरविले आहे.

गेल्या काही दिवसांत बेळगावात घडलेल्या दगडफेकीसारख्या घटनांवरून बेळगावातील मराठी माणसांना जबाबदार धरण्यात येत आहे. महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर कर्नाटकी पोलीस राष्ट्रद्रोहासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मुद्दाम दाखल करत आहेत. त्याच्या निषेधार्थ येत्या २२ जानेवारीला शिवसेनेतर्फे ‘चलो बेळगाव’ची हाक देण्यात आली आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून, त्यांना अभिवादन करून कोल्हापूर-बेळगाव निषेध पदयात्रेला प्रारंभ करण्यात येईल. या पदयात्रेत हजारो शिवसैनिक, मराठी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत असे शिवसेनेने म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचा हा नियोजित निषेध मोर्चा यशस्वी होऊ न देण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी आतापासूनच खबरदारी घेतली आहे. २२ जानेवारीला राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाक्याजवळ कर्नाटकाच्या प्रवेशद्वारावरच पदयात्रा अडविण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे. शिवसेना आपल्या गनिमीकाव्याबद्दल प्रसिद्ध आहे. त्यामुळे केवळ महामार्गच नव्हे तर महाराष्ट्राच्या हद्दीलगत खेड्यांतून शिवसैनिक त्यादिवशी किंवा त्याआधी पोलिसांना चकवा देऊन कर्नाटकात प्रवेश करतील या भीतीने महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व मार्गांवर कर्नाटक पोलीस आतापासूनच डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.


Recent Comments