बेळगावातील एपीएमसी मार्केटयार्डात रविवारी सकाळी ग्राहकांची तोबा गर्दी झाल्याने कोरोना नियमांचा फज्जा उडाला.

होय, मास्क न घालता, सामाजिक अंतर न पाळता बेळगावच्या एपीएमसीत व्यवहार सुरु आहेत. रविवारी विकेंड कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचे येथे दिसून आले. सकाळपासूनच एपीएमसी मार्केटयार्डात व्यापाऱ्यांची, ग्राहकांची गर्दी झाली होती.
मात्र अनेकांनी मास्क घातला नाही किंवा सामाजिक अंतरही पाळले नाही. एकीकडे बेळगावात जिल्ह्यात त्यातही बेळगाव शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग वाढत आहे. तरीही लोक खबरदारी घ्यायला तयार नाहीत हे एपीएमसीतील व्यवहारांवरून दिसून आले. जयकिसान होलसेल भाजीमार्केट सुरु झाल्याने व्यापाऱ्यांची संख्या विभागली असली तरीही एपीएमसीत नियम पायदळी तुडवत व्यवहार सुरु ठेवण्यात आले होते.
बेळगावात शेजारील गोवा, महाराष्ट्रातून व्यापाऱ्यांची ये-जा सुरु असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनानेही काणाडोळा केला आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Recent Comments