विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालिकेच्या व्हॉल्व्हमन्सनी आपला संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे बेळगावात सर्वत्र पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
होय, सेवेत कायम करावे, दरमहा वेळेवर वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी बेळगाव महापालिकेत अनेक वर्षांपासून करारावर काम करणाऱ्या व्हॉल्व्हमन्सनी गेल्या ५ वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. मात्र सरकार आणि महापालिकेने त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्हॉल्व्हमन्सनी कामावर बहिष्कार टाकून संपाचे अस्त्र पुकारले आहे. त्यामुळे गेल्या १०-१२ दिवसांपासून बेळगाव शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्याची झळ नागरिकांना बसत आहे. त्यामुळे लोक मिळेल त्या वाहनांतून तर काही ठिकाणी चक्क हातगाडीवरूनही कळशा भरभरून पाणी नेताना दिसत आहेत.
देवादिकांनाही ‘पाणी बंद’चा फटका
यासंदर्भात ‘आपली मराठी’ सोबत बोलताना गणपत गल्लीतील गणपती मंदिराचे पुजारी सूर्यकांत खासबाग म्हणाले, गणपत गल्लीत गेल्या ८ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. मंदिरात पूजेलाही पाणी मिळेना झाले आहे. त्यामुळे पावले यांच्याकडे एक कळशी पाणी नेण्यासाठी आलो आहे. व्हॉल्व्हमन्सच्या संपाचा फटका नागरिकांना बसत आहे. सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे झोंबणारी थंडी आणि त्यात भरीस भर म्हणून पाणी टंचाई अशा तिहेरी संकटात बेळगावकर सापडले आहेत.
Recent Comments