Belagavi

लॉकडाउन लावायचा असेल तर अर्थसाह्य द्या : कलाकारांची मागणी 

Share

आता जर लॉकडाउन लावायचा असेल तर सरकारने जिल्ह्यातील विविध कलाकारांना अर्थसाह्य देऊनच तो निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्ह्यातील विविध कलाकार संघांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याआधी कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये गरीब, कष्टकऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. कलेवर अवलंबून सणाऱ्या जिल्ह्यातील विविध कलाकारांची व त्यांच्या कुटुंबीयांनीही बरीच परवड झाली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत लॉकडाउन लावायचा असेल तर कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपये दरमहा मदत करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना कलाकार संजू बसय्या म्हणाले, दरवर्षी सीझनमध्येच सरकार लॉकडाउन जारी करत असल्याने कलाकारांची उपासमार होत आहे. उदरनिर्वाहासाठी आम्ही कलेवर अवलंबून आहोत. लॉकडाउनमुळे आमची परिस्थिती बिकट होते. त्यामुळे एक तर आम्हाला कला सादरीकरणाची संधी द्यावी किंवा आर्थिक मदत द्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे. आम्हाला सरकारी फूड किट मिळाले नाही. लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावरच आम्ही गुजराण केली आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातील कलाकार, कन्नड आंदोलक दीपक गुडगनट्टी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: