कोविड संकटात भारतीय रेडक्रॉस संघटना हलाखीत जगणाऱ्या गरीब कुटुंबाना अन्नधान्याचे किट्स वाटपाचे महान कार्य करत आहे असे उद्गार खा. मंगल अंगडी यांनी काढले.

गुरुवारी बेळगावातील गणेशपूर येथील एस. निजलिंगप्पा साखर संशोधन संस्थेत भारतीय रेडक्रॉस संस्थेची जिल्हा व राज्य शाखेतर्फे प्रायोजित रेडक्रॉसच्या शताब्दीपूर्ती निमित्त सिंगर शिलाई मशीन आणि रेशनकीट्स वाटपाचा कार्यक्रम पार पडला. रोपाला पाणी घालून खा मंगल अंगडी यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
उदघाटनांतर बोलताना खा. अंगडी म्हणाल्या, कोविडच्या पहिल्या लाटेत पीडित कुटुंबाना रेडक्रॉसने मोठी मदत केली आहे. उपचारांसाठी लागणारे ऑक्सिजन, मास्क, सॅनिटायझर तसेच अन्नधान्याची खूप मोठी मदत या संस्थेने गरजूना केली आहे. हे कार्य प्रशंसनीय आहे. 
त्यानंतर बोलताना उसविकास आणि साखर संचालक शिवानंद कलकेरी म्हणाले, रेडक्रॉसचे कार्य केवळ एखादा वर्ग किंवा भाषेपुरते मर्यादित नाही. जनसेवा करताना त्यामागे विश्वबंधुत्वाची भावना हवी. कोविड संकटामुळे अनेकांची परवड सुरु आहे. अशा स्थितीत रेडक्रॉस करत असलेले मदतकार्य प्रशंसनीय आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी, रेडक्रॉसच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मी स्वतः या संस्थेचे काम पाहिले आहे. कोणाला ऑक्सिजनची गरज आहे हे डॉक्टरांना स्वतः भेटून त्याची सोय करून किमान २०० जणांना रेडक्रॉसने बरे केले आहे. कोविड संकटाने रोजगार हिरावून घेतलेल्या अनेक कुटुंबांना शिलाई मशीन देऊन स्वावलंबी करण्याचे कार्य या संस्थेने केले आहे ही कौतुकाची बाब आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले.
याप्रसंगी भारतीय रेडक्रॉसचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Recent Comments