राज्यात सर्वप्रथम बेळगावात तृतीयपंथीयांना स्वतःचे असे खास ओळखपत्र सरकारतर्फे देण्यात आले आहे. त्याबद्दल ह्युमॅनिटी फौंडेशनचे प्रवक्ता किरण बेडी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारने देशातील तृतीयपंथीयांना स्वतःचे ओळखपत्र देण्याचा आदेश २०१९मध्ये जारी केला होता. त्यानुसार बेळगावात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी तृतीयपंथीयांना ओळखपत्रांचे वाटप केले.
त्यानंतर बोलताना ह्युमॅनिटी फौंडेशनचे प्रवक्ता किरण बेडी यांनी आनंद व्यक्त करून सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यांत महिला व बालकल्याण खात्यातर्फे मेरिट फौंडेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना स्वतःचे असे खास ओळखपत्र देण्यात येत आहे. पोलीस खात्यातही शेकडा १ इतकी पदे तृतीयपंथीयांना राखीव ठेवण्यात आली आहेत. हा समुदाय सर्व क्षेत्रांत काम करण्यास समर्थ आहे. १७०० तृतीयपंथीयांपैकी ६ जणांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. ही ओळखपत्रे या समुदायाला फार महत्वाची व उपयोगी ठरणारी आहेत असे त्यांनी सांगितले. 
महिला आणि बालकल्याण खात्याच्या डब्लू डी आय रूपा पवार म्हणाल्या, नॅशनल पोर्टल आणि सामाजिक न्याय खात्याकडून तृतीयपंथीयांना ओळखपत्रे देण्यात येत आहेत. सरकारी नोकरीत आरक्षणासाठी, सरकारी कामांसाठी हे ओळखपत्र खूप महत्वाचे आहे. अर्ज केल्याच्या ३० दिवसांच्या आत ते देण्यात येत आहे असे सांगितले.
एकंदर तृतीयपंथीयांना स्वतःची ओळख सांगणारी ओळखपत्रे देण्यात येत असल्याने या समुदायाने समाधान व्यक्त केले आहे.


Recent Comments