Belagavi

समान कायद्यांतर्गत भाजप नेत्यांवरही तक्रार दाखल व्हावी : भीमाप्पा गडाद

Share

मेकेदाटू प्रकल्पासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झालेल्या मान्यवरांवर तक्रार दाखल करण्यात आली असून समान कायद्यांतर्गत भाजप जनमेळाव्यात सहभागी झालेल्या भाजप नेत्यांवरदेखील तक्रार दाखल करण्यात यावी, असा आग्रह माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केलाय.

यासंदर्भात शासनाला पत्र लिहिण्यात येणार असल्याची माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून भीमाप्पा गडाद यांनी प्रसार केली असून सत्ताधारी, विरोधी आणि इतर पक्षांसह देशाचे पंतप्रधान आणि जनता या साऱ्यांसाठी समान कायदा असल्याचे सांगितले आहे.

काँग्रेसने आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झालेल्या ३१ जणांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे स्वागतार्ह आहे. मात्र मागीलवर्षी जानेवारी मध्ये झालेल्या भाजपच्या जनमेळाव्यात कोविड काळात देखील गर्दी जमविण्यात आली होती. यावेळी या मेळाव्यात सहभागी झालेल्या भाजप नेत्यांवर आणि प्रामुख्याने केंद्रीय मंत्री अमित शहा, तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर देखील तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे भीमाप्पा गडाद यांनी सांगितले.

एक लाखाहून अधिक जनतेला एकत्रित करून हा मेळावा पार पाडण्यात आला. या मेळाव्यात झालेल्या गर्दीमुळे कदाचित कोविड अधिक पसरला. दररोज अनेक लोकांचे कोविडमुळे बळी गेले. हा जनमेळावा रद्द करण्यात यावा यासाठी मी निवेदन दिले होते. परंतु त्यावेळी कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. काँग्रेस नेत्यांवर ज्याप्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याचप्रमाणे भाजप नेत्यांवरदेखील कोविड नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव तक्रार दाखल करण्यात यावी, अन्यथा यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा भीमाप्पा गडाद यांनी दिलाय.

Tags: