Accident

अभिनेता हेमंत बिर्जे, पत्नी रेश्मा अपघातात जखमी

Share

मूळचे बेळगावचे आणि ‘ऍडव्हेंचर्स ऑफ टारझन’ या चित्रपटात काम केल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत टारझन म्हणूनच ओळखले जाणारे अभिनेता हेमंत बिर्जे यांच्या कारला मंगळवारी रात्री पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. यात ते व त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर उर्से टोल नाक्याजवळ मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास हेमंत बिर्जे यांची कार दुभाजकाला जाऊन आदळली. यावेळी कारमध्ये बिर्जे, त्यांची पत्नी रेश्मा व मुलगी सोनिया होती. अपघातात बिर्जे व त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या मुलीला काही दुखापत झाली नसल्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी सांगितले. त्यांच्यावर पवना इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

हेमंत अनंत बिर्जे (वय ६०) हे मूळचे बेळगावचे. बेळगावात १९ ऑगस्ट १९६१ रोजी त्यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते मुंबईत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. १९८५ च्या सुमारास दिगदर्शक बब्बर सुभाष त्यांच्या ‘ऍडव्हेंचर्स ऑफ टारझन’ या चित्रपटासाठी हिरोच्या शोधात होते. त्यांना दिसायला देखणा पण थोडासा लाजाळू नायक हवा होता. त्यावेळी त्यांची नजर हेमंतवर पडली. त्यामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची दारे खुली झाली. परंतु चित्रपट सृष्टीत अनेक सितारे जसे काही काळानंतर बेपत्ता होतात तसेच हेमंत बिर्जे यांचे झाले. टारझन नंतर त्यांना चित्रपटसृष्टीत हवे तसे यश मिळू शकले नाही. त्यांचा मुलगा बॉबी रे चिलीज एन्टरटेनमेन्टसोबत काम करतो. तर मुलगी सोनिया अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Tags: