एखाद्याच्या घरात चोरी झाल्यानंतर पाेलिसात तक्रार देणाऱ्याला आपला चाेरी गेलेला आपला ऐवज कधी परत मिळेल याची प्रतीक्षा असते. मात्र एका चोराने चोरलेला एकूणएक ऐवज सहीसलामत परत करून वर माफी मागितल्याची विस्मयकारक घटना नाशिक येथे घडली आहे.
पोलिसांसमोरही चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान असते. मात्र नाशिकमधील जेलराेड परिसरातील कॅनलरोड येथे राहणाऱ्या तक्रारदाराला चोरानेच सुखद धक्का देत चिठ्ठी लिहून माफी मागत चाेरलेल्या दागिन्याची बॅग घराच्या छतावर सोडून दिली. नाशिकरोड पोलिसांना घटनास्थळी ही बॅग सापडली.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार, शरद साळवे (रा. विठ्ठलनगर जलकुंभाजवळ, जेलरोड) यांनी शनिवारी (दि. ८) घरफोडी झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी जात पंचनामा सुरू केला. याचवेळी दुसऱ्या पाेलिस पथकाने या घराच्या आसपास तपास सुरू केला. घरफोडी कशी झाली असेल तसेच चोराने घरात कसा प्रवेश केला असेल याचा शोध घेत असताना पोलिसांना घराच्या छतावर एक बॅग आढळली. यात सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र असा चोरी गेलेला ऐवज होता. साेबतच एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘तुमच्या गल्लीतलाच एक माणूस, मला माफ करा, मी तुमची बॅग घेतली आणि पत्र्यावर टाकली. मला पैशांची गरज हाेती पण मी ते घेतले नाही, साॅरी मला माफ करा’ असा मजकूर लिहिलेला हाेता. पोलिसांनी साळवे यांच्या तक्रारीनुसार अनोळखी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Recent Comments