पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ योजना राबविली जात आहे. परंतु ही योजना केवळ कागदोपत्री, सरकारी इमारतीवरील भिंती, शाळा-परिसरातील भिंती आणि केवळ जाहिरातबाजीपुरती मर्यादित आहे का? असा यक्ष प्रश्न सध्या प्रत्येक भागात उपस्थित केला जात आहे. या योजना वास्तवात देखील आहेत का? असा प्रश्न खानापूर तालुक्याजवळील हलकर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीत उपस्थित केला जात आहे.. नेमकी काय व्यथा आहे येथील नागरिकांची? जाणून घेऊयात या पुढील रिपोर्टमधून….

खानापूर तालुक्याजवळ असलेल्या हलकर्णी ग्रामपंचायत व्याप्तीत येणारे गांधीनगर… या परिसरातील रस्त्याच्या आजूबाजूला प्लास्टिक बाटल्या, वेस्ट पेपर्स यासह बराच कचरा आपल्याला आढळून येतो. केवळ रस्त्याशेजारीच नाही तर अनेक ठिकाणी कचऱ्याचा ढीग दिसून येतो. या मार्गांवरून दररोज वर्दळ असते. या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या अनेकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा या कचऱ्याची उचल करण्याची तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची विनंती केली आहे. परंतु ग्रामपंचायतीकडून कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद देण्यात आला नसून या परिसराला कोणी वाली उरला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. 
गांधीनगर प्रमुख रस्त्यावर के एल एस संस्थेचे पदवीपूर्व महाविद्यालय आहे. शेजारीच तालुका मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे… या मार्गांवरून जनतेची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर झालेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे अस्वच्छतेसह दुर्गंधीदेखील पसरली आहे. याच रस्त्यावर बसस्थानक देखील आहे. परंतु या साऱ्या परिसरातून मार्गस्थ होताना प्रत्येकाला नाकावर रुमाल ठेवण्याची वेळ आली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी तत्पूर्वी या कचऱ्याची उचल वेळेत करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
यासंदर्भात खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी बोलताना सांगितले कि, सदर प्रकार हलकर्णी ग्रामपंचायत, खानापूर नगर पंचायतीच्या निदर्शनास अनेकवेळा आणून दिला आहे.. परंतु याच्याशी आपले काही देणे घेणे नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. कचऱ्याचे ढीग याठिकाणी वाढत चालले असून या कचऱ्याची विल्हेवाट न लावण्यात आल्यास आगामी काळात वकिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ईश्वर घाडी यांनी दिला.
देशभरात ‘ स्वच्छ भारत, सुंदर भारत’ संकल्पनेतून योजना राबविण्यात येत आहेत. परंतु तरीही बहुतांशी भागात कचऱ्याची समस्या जैसे थे अशीच आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या परिसराची स्वच्छता होणे हे अत्यंत महत्वाचे असून संबंधित प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरविण्याची नितांत गरज आहे.


Recent Comments