जेष्ठ गायक, अभिनेते, माजी मराठी नाट्यसंमेलनाध्यक्ष रामदास कामत यांचे शनिवारी रात्री ९.४५ च्या सुमारास मुंबईतील विलेपार्ले येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
मराठी नाट्यसृष्टीच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, उत्तम अभिनेते आणि गायक अशी रामदास कामत यांची ओळख आहे. त्यांच्या मागे मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत, नातू व नातसून असा परिवार आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या रामदास कामत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३१ रोजी म्हापसा येथे झाला. अभिनेता आणि गायक म्हणून व्यावसायिक मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. इतकेच नाही तर नाट्यसंगीतासोबतच भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली. लहानपणी वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून त्यांनी संगीत, नाट्यसंगीताची धडे गिरवले. त्यानंतर पं. गोविंदबुवा अग्नी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी यांच्यासह प्रभाकर पेंढारकर, भालजी पेंढारकर यांच्याकडे त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे धडे घेतले. यशवंत देव यांच्याकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. संगीताचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दि गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकातून त्यांनी आपल्या रंगभूमीवरील संगीत कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ ही त्यांची प्रार्थना अजरामर आहे.



Recent Comments